वादळामुळे तुटलेल्या तारा,विजेचे खांब, रोहित्र. तातडीने दुरूस्त न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.. आमदार अनिल पाटील…

अमळनेर (प्रतिनिधि) वादळामुळे तुटून पडलेल्या तारा ,रोहित्र , विजेचे खांब यांची तातडीने दुरुस्ती करा आणि मंजूर झालेली कामे न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका अशी मागणी आमदार अनिल पाटील महावितरण चे अधीक्षक अभियंता अनिल महाजन याना दिले आहे. व तात्काळ दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे करण्यात आला.
एप्रिल मे महिन्यात वादळी पावसाने अमळनेर तालुक्यातील काही विजेचे खांब आणि विद्युत तारा तुटून पडल्या होत्या. रोहित्र खराब झाले होते. मात्र जून महिना अर्धा उलटला तरी अद्यापही तारा ,विजेचे खांब आणि रोहित्र दुरुस्त न झाल्याने शेतकऱ्याना शेती व मशागती करण्यास अडचणी येत आहेत. काही ठिकाणी पाणी देता येत नसल्याने भाजीपाला पिके व उन्हाळ्यात लावलेली पिके करपू लागली आहेत. जिल्हा नियोजन समितीकडून विविध नवीन रोहित्र , विजेचे खांब ,जीवघेण्या तारा व रोहित्र स्थलांतरणाची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यापैकी काही कामे मंजूर झाली आहेत. मात्र ठेकेदार मंजूर कामे करायला तयार नाहीत. अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे. आणि तारा व रोहित्र स्थलांतरला मंजुरी द्यावी. अमळनेर तालुक्यातील सारबेटे व पारोळा तालुक्यातील शेळावे येथील मंजूर सबस्टेशनची कामे लवकरात लवकर सुरू करण्यात यावेत अशीही मागणी आमदार पाटील यांनी अधीक्षक अभियंत्यांकडे केली आहे.