मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्याच्या इशारा देताच, सात्री येथील पर्यायी रस्त्याला मान्यता..

अमळनेर (प्रतिनिधि) तालुक्यातील सात्री येथील पर्यायी रस्त्याला अखेर तापी महामंडळाचे कार्यकारी अभियंता ई श पवार यांनी तत्त्वता मान्यता दिली आहे. सात्रीचे माजी सरपंच महेंद्र बोरसे यांनी सकाळी उपविभागीय कार्यालयात काळे कपडे घालून आंदोलन करून मुख्यमंत्र्यांना जिल्ह्याच्या दौऱ्यात काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा इशारा दिल्यानन्तर दुपारून तातडीने मंजुरी देण्यात आली.
गेल्या काही वर्षांपासूनपासून सात्री गावाला रस्ता नसल्याने प्रमोद बोरसे , आरुषी भिल व उषाबाई भिल यांचा मृत्यू झाला होता. तरी प्रशासनाने दखल घेतली नाही म्हणून सात्री ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व अधीक्षक अभियंता पाटबंधारे यांच्या कार्यालयात आरुषी व उषाबाई यांच्या पुतळ्याची अंत्ययात्रा काढली होती. त्यांनंतरही प्रशासनामार्फत अनेक त्रुट्या काढल्या जात होत्या. दरवर्षी येरे माझ्या मागल्या प्रमाणे सात्री करांच्या तोंडाला पाने पुसली जात होती. म्हणून २६ रोजी सकाळी महेंद्र बोरसे यांनी काळे कपडे , डोक्यावर काळे फडके घालून उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर याना कवड्यांची माळ भेट दिली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जळगाव दौऱ्यात काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा इशारा दिला होता. याची तातडीने दखल घेत तापी महामंडळाचे कार्यकारी अभियंता पवार यांनी अधीक्षक अभियंता याना पत्र देऊन निम्न तापी प्रकल्पाच्या तृतीय सुधारित मान्यतेनुसार बुडीत क्षेत्राच्या रस्त्यांसाठी उपलब्ध निधीतून ४ कोटी ५६ लाख ६२ हजार ९८१ रुपये किमतीच्या पर्यायी रस्त्यास तत्त्वता मान्यता दिली आहे.