‘शासन आपल्या दारी’ विद्यार्थी गेले नाही शाळेच्या दारी.

अमळनेर (प्रतिनिधि) शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी जळगाव ला एस टी ने जादा बसेस सोडल्याने शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. काही तास विद्यार्थी बसस्थानकावर ताटकळत उभे होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यासाठी विविध क्षेत्रातील लाभार्थ्यांना जळगाव आणण्यासाठी आदेश सुटले होते. आणि अधिकारी ,पदाधिकारी याना बस भरून आणण्यासाठी सक्ती करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे अमळनेर तालुक्यातून देखील २५ एस टी बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे अमळनेर आगारातील बस फेऱ्यांवर परिणाम झाले. आगारात ७० बस असून २५ जळगाव दौऱ्यासाठी पाठवण्यात आल्या होत्या. त्यात काही नादुरुस्त असल्याने आणखीच अडचण वाढली होती. ग्रामीण भागातून अनेक विदयार्थी शाळेत ,महाविद्यालयात अमळनेर ला येत असतात. परंतु सकाळी काही ठिकाणी एस टी पोहचलीच नाही. आणि काही ठिकाणी उशिरा एस टी पोहचल्याने मुले मुली शाळेत जाऊ शकले नाहीत. काहींना उशिरा बस मिळाली. सर्वत्र हीच अडचण आल्याने मुलांमध्ये एस टी चा संप असल्याची अफवा पसरली होती.
दुपारून मुले मुली घरी पोहचली नाहीत म्हणून पालकांना चिंता वाटत होती. काही पालक आपल्या आपल्या पाल्याना शोधण्यासाठी अमळनेर आले होते.