क्रीडा संकुल बाबत जिल्हाधिकारी यांना तक्रार सादर..

जळगाव ( प्रतिनिधी )
जिल्हाधिकारी हे जिल्हा क्रीडा संकुल समितीचे उपाध्यक्ष असल्याने नवनियुक्त जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना गणतंत्र दिवसाच्या पूर्वसंध्येला विविध क्रीडा संघटनाचे पदाधिकारी तथा क्रीडा संघटक फारुक शेख यांनी क्रीडा संकुल व क्रीडांगणा बाबत ९ मुद्द्या बाबत तक्रार सादर केली.
या तक्रारीवर चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी फारुक शेख यांना दिले आहे.
तक्रारीरीतील मुद्दे
१) संकुल समितीचे कार्य नोंदणीकृत घटनेनुसार चालत नसून क्रीडा धोरणाची सुद्धा अंमल
बजावणी करण्यात येत नाही.
२) संकुल मध्ये विविध संघटनांच्या कार्यालयासाठी २० कार्यालय धूळ खात पडलेले आहे ते संघटनेला त्वरित देण्यात यावी.
३) जलतरण तलावावर आता पावेतो ३ तरुण मृत पावले असताना सुद्धा आवश्यक ती सुरक्षा उपाय योजनेची व शासनाने दिलेल्या जलतरण तलावाच्या खोलीबाबत मार्गदर्शन तत्त्वांचे सुद्धा अंमलबजावणी केली जात नाही व त्यामुळेच तीन तरुणांचा जीव गेलेला आहे.

४) बॅडमिंटन हॉलमधील लाकडी फळ्या मोठ्या प्रमाणात तुटलेल्या असून सुद्धा त्याची रिपेरिंग केली जात नाही अथवा त्यात बदल केले जात नाही त्यामुळे लहान खेळाडूंना वारंवार गंभीर दुखापतीला सामोरे जावे लागत आहे.
५) खेळाडूंच्या निवासासाठी ४० रूम असून त्यातील पुष्कळ रूम मध्ये लाईट, पंखा, नळ कनेक्शन, खिडकी दारावरील कोंडे तुटलेल्या अवस्थेत आहे त्याची दुरुस्ती करण्यात येत नाही
६) संकुलावर एकमेव असलेल्या क्रीडांगणाची देखभाल होत नसल्याने ४०० मीटर ट्रॅक पूर्णपणे खराब झालेला आहे, तसेच फुटबॉल, सॉफ्ट बॉल, हॉकी चा सराव क्रीडांगणावर करताना खेळाडूंना जोखीम पत्करावी लागते, क्रीडांगणावर संपूर्णपणे स्वच्छतेचा अभाव आहे.
७) खेळाडू व पोलीस भरती सराव करणारे व इतर हौशी खेळाडूंना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही तसेच जे स्वच्छतागृह आहे त्याचा उपयोग करण्यास तेथील अस्वच्छतेमुळे कोणीही आत जात नाही
८) क्रीडांगणाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने त्याची निगा राखण्यासाठी त्यावर कधीही पाणी मारले जात नाही, रोलिंग केले जात नाही त्यामुळे क्रीडांगण अत्यंत खराब झालेले आहे. क्रीडा संकुलाला रंगरंगोटी सुद्धा करण्यात आलेली नाही.
९) क्रीडा संकुल समितीकडे तसेच क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाचा अभाव आहे तरीसुद्धा त्या ठिकाणी आवश्यक ती पदे त्वरित भरली जावी.
फारुक शेख यांनी ही तक्रार सादर केली तेव्हा जिल्हाधिकारी यांच्या कक्षात जिल्हा क्रीडा अधिकारी व त्यांचा कार्यालयातील संपूर्ण कर्मचारी वर्ग उपस्थित होता.