भारतीय हवामान खात्याची खुशखबर. सप्टेंबर महिन्यात पावसाचे पुनरागमन..

24 प्राईम न्यूज 1 Sep 2023यंदा ऑगस्टमध्ये पाऊस कमी झाल्याने शेतकऱ्यांसह सरकारसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. कारण वर्षभर शेतीला, प्यायला, वापरायला पाण्याची टंचाई भासू शकते. पण, सप्टेंबरमध्ये मान्सूनचे भारतात पुनरागमन होईल, अशी आनंदाची बातमी भारतीय हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिली आहे.
यंदा जूनमध्ये कमी पाऊस झाला. त्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र, जुलैमध्ये चांगला पाऊस झाल्याने जूनची तूट भरून निघाली. जुलैमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. ऑगस्टमध्ये पावसाने देशभरातील शेतकऱ्यांसह सर्वांची निराशा केली आहे. १९०१ नंतर पहिल्यांदाच ऑगस्टमध्ये कमी पाऊस झाला. भारतीय हवामानविभागाने गुरुवारी पत्रकार परिषद घेत सप्टेंबर महिन्यात पावसाची स्थिती कशी असेल यासंदर्भात माहिती दिली. सप्टेंबर महिन्यात मान्सूनच्या पावसाचं पुनरागमन होईल. देशातील मध्य आणि दक्षिण भारतात चांगला पाऊस पडेल, असे आयएमडीचे संचालक मृत्युंजय महापात्रा यांनी म्हटले आहे.