एरंडोलला शिवसेनेचा ऐतिहासिक तालुका मेळावा संपन्न…
विविध पक्षातून तीनशे कार्यकर्त्यांचा प्रवेश, दोनशे पदाधिकाऱ्यांची नियुक्ती….

एरंडोल ( कुंदन ठाकुर)
गेल्या वर्षभरापूर्वी शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर एरंडोल तालुक्यात शिवसेना कमजोर होण्याची शक्यता वाटत असतानाच शिवसेनेने अधिक जोमाने भरारी घेतल्याचे दिसून येत आहे… आज एरंडोल शहरातील कमल लॉन्स येथे शिवसेना युवासेना व महिला आघाडीचा अतिशय भव्य मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला…. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर माजी जि प उपाध्यक्ष हिंमत पाटील, गणेश पाठक व एरंडोल येथील शिंपी बंधूंना श्रद्धांजली वाहण्यात आली. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्ह्याचे संपर्कप्रमुख संजय सावंत होते. या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण एरंडोल तालुक्यातून तीनशेच्या वर कार्यकर्त्यांनी विविध पक्षातून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना उपस्थित मान्यवरांनी शिवबंधन बांधले. त्याचबरोबर जवळपास दोनशे शिवसैनिकांची पक्षाच्या विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली. तसेच तालुक्यातील सुमारे १०० ज्येष्ठ शिवसैनिकांचा देखील सन्मान देखील करण्यात आला…. उपस्थित शिवसैनिकांनी जय भवानी जय शिवाजी च्या घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहरप्रमुख कुणाल महाजन यांनी केले तर प्रास्ताविक तालुकाप्रमुख रवींद्र चौधरी यांनी केले. आपल्या प्रस्तावनेतून चौधरी यांनी तालुक्यातील शिवसेना अधिकाधिक भक्कम करण्याचा व आगामी काळातील सर्व निवडणुका जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन यांनी आपल्या आक्रमक शैलीत आमदार चिमणराव पाटील यांच्यावर कडाडून टीका केली. आमदार पाटील यांच्याकडून आपल्यावर झालेल्या अन्यायाची परतफेड आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांची अनामत रक्कम जप्त करून करू असा संकल्प त्यांनी केला. आपल्या अध्यक्षीय भाषणात संजय सावंत यांनी राज्य शासनाच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले. “शासन आपल्या दारी” हा कार्यक्रम राबवून राज्यातील जनतेच्या डोळ्यात केवळ धूळपेक करीत आहेत असा आरोप त्यांनी केला. हे सरकार सामान्य शेतकऱ्यांचे नसून खोकेबाजांचे असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने यांनी मराठा आरक्षणासाठी झगडणाऱ्या बांधवांवर राज्यकर्त्यांनी केलेल्या लाठीमाराचा तीव्र शब्दात निषेध केला तसेच जळगाव येथे होणाऱ्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यासाठी मतदार संघातून जास्तीत जास्त शिवसैनिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. माजी जि प सदस्य नानाभाऊ महाजन यांनी बंडखोर आमदारांना मताधिक्य एरंडोल तालुक्याने दिले असून तालुक्यातील संघटना ही पूर्वीपेक्षा भक्कम झाल्याने व अनेक प्रलोभने देऊनही कडवट शिवसैनिक प्रतिसाद देत नसल्याने आमदार हतबल झाले असल्याचे सांगितले. याप्रसंगी सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील, युवासेना जिल्हा समन्वयक अतुल महाजन, शिवसेना तालुका समन्वयक संजय पाटील, सुरेश बळीराम पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक दगडू महाजन आदींनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे,महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदाताई पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, समन्वय समितीचे माजी अध्यक्ष रमेश महाजन, माजी जि प उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, माजी सभापती मोहन सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष संजय महाजन, माजी नगरसेवक रुपेश माळी, सेवक सुभाष मराठे, माजी नगरसेवक सुनील चौधरी, माजी नगरसेवक सुरेश खुरे, माजी नगरसेवक गणेश मराठे, माजी सभापती रजनी सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष आरती महाजन, माजी नगरसेविका कल्पना महाजन, माजी नगरसेविका हर्षाली महाजन, युवासेना तालुकाप्रमुख गुलाबसिंग पाटील, युवासेना शहर प्रमुख प्रमोद महाजन, हरेश पांडे, रेवानंद ठाकूर, राजा भेलसेकर, सुनील मानुधने, प्रसाद दंडवते, रवी पवार, उत्तम पाटील, रावसाहेब पाटील, गिरड येथील मधुकर पाटील, किशोर महाले, दिलीप चौधरी, परेश बिर्ला, अमोल भावसार, अमोल भोई, सुनील मराठे, कल्पेश राजपूत, समाधान चौधरी, गोरख सोनवणे, कुणाल पाटील, गजानन महाजन, अनिल महाजन, हेमंत पाटील, कल्पेश महाजन, दिनेश पांडे, भारत चौधरी, यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.