शास्त्री फार्मसीत इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न..

एरंडोल (कुंदन ठाकुर)दि ६ ऑक्टोबर-२०२३ रोजी प्रथम वर्ष बी. फार्मसी व डी. फार्मसी प्रवेशीत विद्यार्थ्यांचा इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उच्च शिक्षण तज्ञ् डॉ. प्रशांत अरगडे (फार्मसी विभागप्रमुख, शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव) यांची उपस्थिती लाभली. डॉ. प्रशांत अरगडे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत असताना सांगितले कि, जीवनात उच्च लक्ष व अथक परिश्रम यांच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थीसुद्धा प्रगती करू शकतात. त्यांनी भारतीय औषधी उद्योगाची सद्य स्तिथी व भविष्यातील विकास, संधी आणि आव्हाने याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सविस्तर बोलत असताना त्यांनी औषधी निर्माण क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी त्रिसूत्री नियम मुलांना सांगितले- लक्ष्य निर्धारित करा, लक्ष्य केंद्रित करा आणि स्वतः वर विश्वास ठेवा.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व प्राचार्य. डॉ. विजय शास्त्री यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी योग्य ते सर्वांगीण सहकार्य देईल असे सांगितले. विद्यार्थ्यांनी आपण ग्रामीण भागातील आहोत या संकल्पनेला छेद दयावा व आपण जगातील कुठल्याही स्पर्धेला सामोरे जाऊ शकतो हा आत्मविश्वास बाळगावा. त्यांनी आजच्या जगातील कौशल्य आणि व्यक्तीमत्व विकासावर लक्ष केंद्रित करावे असे संबोधित केले.
तर प्रा. राहुल बोरसे व प्रा. करण पावरा यांनी बी. फार्मसी च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रम व परीक्षे संदर्भात माहिती दिली. डी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांना प्रा. हेमंत चौधरी व प्रा. मिनल वारे यांनी आगामी शैक्षणिक वर्षाची माहिती दिली.
कार्यक्रमास संस्थेच्या सचिव सौ. रूपा शास्त्री यांची उपस्थिती व योगदान लाभले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. आदिल पटेल व आभार प्रदर्शन प्रा. जावेद शेख यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी व समस्त प्राध्यापक वृंद तसेच संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्री. शेखर बुंदेले यांनी प्रयत्न केले.