नवाब मलिक अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ४२ वे आमदार !

24 प्राईम न्यूज 8 Oct 2023 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४२ आमदार असल्याचा दावा केला जात होता. परंतु ४१ आमदारांचीच नावे जाहीर व्हायची. तटस्थ असलेल्या आमदारांत माजी मंत्री नवाब मलिक यांचे नाव घेतले जायचे. परंतु, आता निवडणूक आयोगास सादर केलेल्या यादीत समर्थन असलेल्या ४२ व्या आमदाराचे नाव नवाब मलिक असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नवाब मलिक यांनी मविआ सरकारमध्ये मंत्री असताना आक्रमक भूमिका घेत भाजपला सडेतोड उत्तर देण्याची भूमिका निभावली होती. त्यांच्या भूमिकेमुळे अनेकदा भाजपला बॅकफूटवर येण्याची वेळ आली. त्यानंतर त्यांना तुरुंगात जावे लागले. दरम्यान, ते तुरुंगात असतानाच राष्ट्रवादीत फूट पडली. त्यात नवाब मलिक यांची भूमिका काय असणार, याबाबत सर्वांच्या नजरा होत्या. त्यातच शुक्रवारी निवडणूक आयोगासमोर सुनावणीच्या वेळी अजित पवार गटाने आपल्याकडे ४२ आमदार असल्याचा दावा केला, मात्र ४१ आमदारांचीच नावे सांगितली जायची. ४२ व्या आमदाराचे नाव मात्र गुलदस्त्यात असायचे. आता मात्र आ. मलिक हेच ४२ वे अजित पवार समर्थक आमदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मलिक यांना बाहेर काढण्यासाठी अजित पवार यांचा प्रयत्न?
नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बहिणीबरोबर आर्थिक व्यवहार केल्याच्या आरोपावरून तुरुंगाची हवा खावी लागली होती. अनेक दिवस ते तुरुंगात होते. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर खुद्द अजित पवार यांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ते अजित पवार गटासोबतच जातील, असे सांगितले जात होते. आता तर अजित पवार गटाने त्यांच्याबाबत दावा केला असल्याचे सांगितले जात आहे.