सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार सामना रंगनार.

24 प्राईम न्यूज 21 Oct 2023. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन उभ्या फळ्या झाल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील राजकीय संघर्ष आता टिपेला पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालय, विधिमंडळ नियमावली कक्षेतील हा संघर्ष कौटुंबिक पातळीवरही पोहोचण्याचे संकेत मिळत आहेत. येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत खा. सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभा मतदारसंघात सामना रंगण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीत दोन गट पडल्यापासून बारामती लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू आहे.येथे सुप्रिया सुळे विद्यमान खासदार आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने आतापर्यंत बरेच प्रयोग केले. परंतु, त्यांना सुप्रिया सुळे यांना पराभूत करणे जमले नाही. परंतु, आता पवार यांच्या घरातच दोन गट पडल्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरविण्याविषयी चर्चा रंगली आहे. याबाबत अजित पवार यांनीही वेळ आल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे म्हणून काही अंशी या चर्चेला बळ दिले आहे. त्यामुळे बारामतीत नणंद-भावजयीत सामना रंगण्याची चिन्हे असल्याची चर्चा आहे.