दर बुधवारी प्रत्येक प्रभागत राबविणार स्वछता मोहिम… मुख्याधिकारी विकास रमेश नवाळे….

एरंडोल(प्रतिनिधी) एरंडोल नगरपरिषद मार्फत नवीन वर्षाची सुरुवात म्हणून पुन्हा एकदा एरंडोल न.पा.चे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. विकास रमेश नवाळे यांच्या संकल्पनेतून प्रत्येक बुधवारी स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आलेली असून सदर मोहीम प्रत्येक प्रभागात दर बुधवारी राबविण्यात येणार आहे. एरंडोल शहरात एकूण १० प्रभाग असून सदर मोहिमेमध्ये प्रत्येक प्रभागात उकीर्ड्यांची साफसफाई करून त्याच्या सौन्दर्यीकरणात भर टाकण्यासाठी वृक्षारोपण करणे, रस्ते सफाई, गटार सफाई, बी.एस.सी पावडर फवारणी इ. कामे हाती घेण्यात येत आहेत. सदर मोहीम ही नवीन वर्षाचा पहिला बुधवार दि. ०४/०१/२०२३ पासून सुरु करण्यात आलेली असून आज पावेतो प्रभाग क्र. ०८ व ०९ या प्रभागांमध्ये सफाई कामगारांसोबत न.पा. कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा देखील समावेश करण्यात आलेला असून संपूर्ण कार्यालयीन अधिकारी कर्मचारी यांच्या मार्फत प्लास्टिक प्लौग रन काढून रस्त्यावरील प्लास्टिक गोळा करण्यात आले.
यासाठी एरंडोल शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या घरातील कचऱ्याचे ओला व सुका अशा प्रकारात वर्गीकरण करून सदर कचरा आपल्या परिसरात येणाऱ्या घंटा गाडीतच टाकावा. त्याशिवाय इतरत्र गटारी अथवा रस्त्याच्या कडेला कचरा फेकू नये जेणे करून आपला परिसर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यास न.पा.स सहकार्य लाभेल, असे आवाहन न.पा.चे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. विकास रमेश नवाळे यांनी केले.
सदर मोहीम यशस्वीतेसाठी न.पा.चे मुख्याधिकारी, सर्व अधिकारी व कर्मचारी हे परिश्रम घेत असुन शहरातील संबंधित प्रभागातील नागरिक व स्वयंसेवी संघटना यांनी देखील मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून सहकार्य करावे, अशी अपेक्षा एरंडोल नगरपालिका मार्फत व्यक्त करण्यात आली.