देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार ! राजकीय भूकंपाचे भाजपचे स्पष्ट संकेत

24 प्राईम न्यूज 28 Oct 2023.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोनच दिवस अगोदर अचानक दिल्ली दौरा केल्यानंतर आज महाराष्ट्र भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांचा ” मी पुन्हा येईन” या आशयाचा व्हिडीओ समाज माध्यमातून शेअर केल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होवून एकनाथ शिंदे यांच्या जागी मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस विराजमान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे शिवसेना आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असतानाच परवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दिल्ली गाठली. त्यांच्या या दौ-यावरून अनेक राजकीय चर्चा रंगल्या असतानाच आज महाराष्ट्र भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांचा मी पुन्हा येईन या आशयाचा व्हिडीओ प्रसारीत करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकनाथ शिंदे यांना आमदार अपात्रता प्रकरणामुळे मुख्यमंत्रीपदावरून पाय उतार व्हावे लागेल, असे विरोधी पक्षाचे नेते उघडपणे सांगत असतानाच भाजपकडून प्रसारीत करण्यात आलेल्या या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना २०१९ च्या निवडणुकीपुर्वी त्यांनी विधानसभेत अधिवेशनावेळी भाषण करताना ” मी पुन्हा येईन ” अशी घोषणा केली होती. आज त्याच घटनेचा व्हिडीओ भाजपकडून प्रसारीत करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.