महायुतीत धुसफूस . -मुख्यमंत्र्यांचा अजित पवार गटाबद्दल नाराजीचा सूर.

24 प्राईम न्यूज 6 Nov 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महायुती अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करीत आहेत. तरीही शिंदे गट आणि अजित पवार गटात एकवाक्यता दिसत नाही.

महायुतीतील या धुसफुशीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार गटाबद्दल नाराजीचा सूर आळवला आहे. मराठा आरक्षणावरून आंदोलक सरकारविरोधात आक्रमक झालेले असताना सत्ताधारी महायुतीत समन्वय नसल्याचे दिसून आले. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण कसे मागे घेता येईल, यासाठी प्रयत्न करीत होते. दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्रपेटल्याचे चित्र होते. आंदोलक रस्त्यावर उतरून जाळपोळ, तोडफोड, दगडफेक करीत होते. त्यात राजकीय नेत्यांनाच लक्ष्य केले जात होते. मात्र, त्याचवेळी राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी थेट मंत्रालयासमोर सरकारविरोधात आंदोलन केले. तसेच राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
यातून महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. या पार्श्वभूमीवर शनिवारी झालेल्या महायुतीच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावरून महायुतीत धुसफूस असल्याचे चित्र पुन्हा एकदासमोर आले.