नवाब मलिक वाद. दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी घेरले.
अजितदादा गटाची कोडी..

24 प्राईम न्यूज 9 Dec 2023
दुसऱ्या दिवशीही नवाब मालकाना घेरले. त्यामुळे अजित पवार गटाची कोंडी झाली असून, मलिक यांची बाजू सावरून घेण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांची धावाधाव सुरू झाली आहे.

नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा आरोप असून, या आरोपामुळे त्यांना तुरुंगात जावे लागले. आजारपणामुळे त्यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर प्रथमच त्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सभागृहात हजेरी लावली. मात्र, महायुतीत सामिल होण्यावरून ठाकरे गटाने महायुती सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. या मुद्यावरून भाजपची गोची होणार होती. मात्र, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लगेचच लेटरबॉम्बचा आधार घेतला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून मलिक यांना महायुतीत घेऊ नये, असे सांगत यातून भाजपला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लगेचच शिंदे गटानेही सावध पवित्रा घेत फडणवीस यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. त्यामुळे अजित पवार गटाची चांगलीच कोंडी झाली.या मुद्यावरून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटालाही ठोस भूमिका घेता आली नाही. पत्रकारांशी बोलताना त्यांनी त्याबाबत थेट उत्तर न देता आधी नवाब मलिक यांची भूमिका समजून घेऊ आणि नंतर उत्तर देऊ, असे सांगितले. तसेच फडणवीस यांनी पाठविलेल्या पत्रावरून आमची चर्चा झाली. परंतु या पत्राचे काय करायचे, ते मी बघून घेईन. तुम्हाला सांगण्याची गरज नाही, असे म्हणून वेळ मारून नेली. दुसरीकडे सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी नवाब मलिक आमच्यासोबतच असल्याचे सांगितले. त्यामुळे या मुद्यावरून अजित पवार गटात गोंधळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मग पटेल कसे चालतात ?
एकीकडे नवाब मलिक यांच्यावरून महायुतीत बेबनाव सुरू झालेला असतानाच काँग्रेसने या वादात उडी घेत एकीकडे नवाब मलिक यांना विरोध करताना प्रफुल्ल पटेल कसे चालतात, असा प्रश्न उपस्थित केला. कारण प्रफुल्ल पटेल यांच्यावरही भाजपने दाऊदचा मित्र इक्बाल मिर्ची याच्याशी संबंध असल्याचा आरोप केला होता त्यानंतर ईडीने त्यांची संपत्ती जप्त केली होती. यावरूनही विरोधकांनी भाजपला घेरले. परंतु यावर भाजपने उत्तर देण्यापेक्षा मौन बाळगणे पसंत केले आहे.