मुंबईतील हिरे व्यापार आपल्या डोळ्यांदेखत पळवला-रोहित पवार

24 प्राईम न्यूज 18 Dec 2023 गुजरातच्या सूरत शहरात जगातील सर्वात मोठे हिरे व्यापार केंद्र उभारण्यात आले आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सूरत डायमंड बोर्सचे उद्घाटन करण्यात आले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून टीका करताना रोहित पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सूरतमध्ये जगातल्या सर्वात मोठ्या ‘डायमंड बोर्स’चे उद्घाटन झाले. याबद्दल गुजरात सरकारचे अभिनंदन करावे की मुंबईतला हिरे व्यवसाय आपल्या डोळ्यांदेखत पळवला गेला याचे दुःख व्यक्त करावे हेच समजेनासे झालेआहे. मुंबईतला हिरे व्यवसाय संपवून सूरतच्या हिरे व्यवसायाला ताकद दिली जात असताना आपले सत्ताधारी आपल्या खुर्च्छा टिकवण्यासाठी केवळ बघ्याची भूमिका घेत राहिले. खुर्चीचा विषय असला तर दिल्लीला पन्नास चकरा मारता, दिल्लीचे पाय धरता आणि महाराष्ट्राच्या हिताचा विषय असतो तेव्हा मात्र बिळात लपून बसता, हाच का तुमचा मराठी बाणा आणि हाच का तुमचा स्वाभिमान ? भाजपसाठी आणि त्यांच्या दोन्ही सहकाऱ्यांसाठी केवळ सत्ता महत्त्वाची आहे का? महाराष्ट्राच्या अस्मितेची तुमच्या लेखी काही किंमत नाही का? अजून काय काय गहाण टाकणार? किमान
महाराष्ट्रासाठी थोडा तरी स्वाभिमान दाखवा, अशी
टीका रोहित पवारांनी केली.