२४ डिसेंबरनंतर १ तासही देणार नाही मराठा आरक्षणावर जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा..

24 प्राईम न्यूज 18 Dec 2023
मराठा आरक्षणासंदर्भात २४ डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या. आम्ही २४ तारखेपर्यंत दिलेल्या वेळेत आता कोणताही बदल होणार नाही. २४ डिसेंबरनंतर एक तासही देणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी आज रविवारी मिंधे सरकारला दिला.
२४ डिसेंबरनंतर आंदोलनाची दिशा कशी राहील, याविषयीची भूमिका २३ डिसेंबर रोजी बीड येथे होणाऱ्या इशारा सभेत जाहीर करणार असल्याचे त्यांनी आज आंतरवाली सराटी येथे झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत सांगितले. छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात शनिवारी सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन आणि संदिपान भुमरे यांनी भेट घेऊन अल्टिमेटमवर विचार करण्याचे आवाहन जरांगेयांना केले होते. त्यानंतर जरांगे पाटील यांनी आज थेट आंतरवाली सराटी येथे समाजाची बैठक घेतली. यावेळी हजारो समाजबांधव उपस्थित होते. या बैठकीत आरक्षण देण्यात वेळकाढूपणा करणाऱ्या सरकारला त्यांनी धारेवर धरले.