मराठा आरक्षणासाठी आणखी एक वर्ष वाट पहावी लागेल..
चंद्रकांत पाटील यांचे धक्कादायक वक्तव्य

24 प्राईम न्यूज 1 Jan 2023.

महाराष्ट्राची लोकसंख्या साडेबारा कोटी असून यामध्ये तीन कोटींहून अधिक मराठा समाज आहे. त्यामुळे आरक्षणाच्या दृष्टीने सगळा डाटा गोळा करण्यासाठी वेळ लागेल. मराठा आरक्षण कधी मिळेल याची निश्चित तारीख सांगता येणार नाही. कदाचित एक वर्षाचाही वेळ लागू शकतो, असे वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहिल्या टप्प्यातील कामांची पाहणी केली. त्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्रात तीन कोटींच्या जवळपास मराठा समाजाची संख्या आहे. त्याचा डाटा गोळा करायला कदाचित एक वर्ष वेळ लागू शकतो. मराठा मागास असल्याचा अहवाल आल्याशिवाय अधिवेशन बोलवता येणार नसल्याचेही पाटील यांनी सांगितले. २०१४ ते २०१९ काळात मी हा प्रश्न जवळून हाताळला. त्यावेळी मागासवर्ग आयोगाला अहवाल द्यायला एका वर्षाचा कालावधी लागला. त्यामुळे तो अहवाल हायकोर्टात टिकला; पण सुप्रीम कोर्टात टिकू शकला नाही. त्यामुळे आता हायकोर्टात आरक्षण टिकणारा अहवाल द्यावा लागणार आहे. यासाठी वेळ लागणार असल्याचे सांगत आरक्षण मागणीसाठी तारीख देऊन आणि अडून बसून चालणार नाही, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे जरांगे यांना टोला लगावला.