भुजबळ-जरांगेंचे चॅलेंज वॉर..

24 प्राईम न्यूज 1 फेब्र 2023. राज्य सरकारने झुंडशाहीसमोर नमते घेऊन मागच्या दाराने कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू केले आहे. ‘सगेसोयरे ‘बाबत काढलेल्या अधिसूचनेमुळे भटके-विमुक्त, वंचित, ओबीसींच्या आरक्षणावर घाला घातला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी केला. अशा परिस्थितीत आमदार- खासदारांसमोर कैफियत मांडणे, न्यायालयाचे दरवाजे ठोठावणे, लोकांमध्ये जनजागृती करणे, आक्रोश व्यक्त करणे असे मार्ग आमच्यासमोर उरल्याचेही भुजबळ यांनी बुधवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले..मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांनी
ओबीसींना आरक्षण देणाऱ्या मंडल आयोगाला आव्हान देण्याबाबत विधान केले आहे. त्याला उत्तर देताना भुजबळ यांनी जरांगे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मंडल आयोगाला आव्हान देऊन दाखवावे, असे ठणकावले. मंडल आयोगाला त्यांना विरोध करायचा असेल तर त्यांनी जरूर करावा आणि मंडल आयोगाला संपवण्याचे काम करून दाखवावे, असे आव्हान भुजबळ यांनी जरांगे-पाटील यांना दिले.
मी एका जातीसाठी नाही तर ओबीसी प्रवर्गासाठी लढत आहे. या प्रवर्गात ४५० जाती आहेत. जरांगे-पाटील केवळ एका जातीसाठी लढत आहेत, अशी टीका भुजबळ यांनी केली. मराठा समाजाला मागच्या दाराने आरक्षणात प्रवेश दिला जात असल्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मंत्रिमंडळ बैठकीत मी यापूर्वी याबद्दल आक्षेप घेतला, पण मंत्रिमंडळाची बैठक विषय पत्रिकेवर चालत असते. त्या विषय पत्रिकेवर हा विषय नव्हता, असा खुलासा भुजबळ यांनी केला.