कथाकथन, काव्यवाचनातून झाली श्यामच्या विचाराची पेरणी

अमळनेर/प्रतिनिधि. वये 17 च्या आतील. पण त्यांची वैचारिक पातळी मोठ्यांनाही लाजवेल अशी शिस्त आणि आदर तर कमालीचा ठासून भरलेला. ऐकणारा त्यांच्या तडफदार व स्पष्ट विचारांनी भारावून गेल्याशिवाय राहणार नाही. ते होते आजचे बालसाहित्यिक तर उद्याचे देशाचे भाग्यविधाते.
निमित्त होते 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे… आणि विषय होता बालसाहित्य संमेलनातील कलाआनंद बालमेळाव्याचे.
साहित्य संमेलनापूर्वी बालसाहित्यिकांचा गुरुवारी आनंद मेळावा घेण्यात आला. यात कथाकथन, काव्यवाचन, बालनाट्य व नाट्यछटा असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.
श्यामच्या विचारांची पेरणी
कथाकथन सत्रात 7 विद्यार्थ्यांनी कथाकथन केले. यात श्याम अर्थात पांडुरंग सदाशिव साने यांच्या बालपणातील व त्यांच्या आईने त्यांच्यावर केलेल्या संस्कारांना उजळणी देली. अंघोळ केल्यानंतर पायाला माती लागू नये म्हणून आईला पदर पसरायला सांगणाऱ्या श्यामने आयुष्यात मनाला घाण लागू दिली नाही, तर उलट इतरांच्या मनातील घाण काढण्याचा प्रयत्न केला. कारण आईने सांगितले होते की पायाला जशी घाण लागू नये म्हणून जसा जपतोस तसा मनाला घाण लागू नये म्हणून जप, या संदेशाचा श्यामने आयुष्यभर अवलंब केला. पोहायला जाण्यास घाबरणारा श्याम नंतर कसा धाडसाने विहिरीत पोहू लागला. रामरक्षा पाठ झाल्यानंतर अत्यांदित झालेला श्याम ते आईला सांगतो. त्यावर आई म्हणते, अरे येत नाही, येत नाही असे कसे म्हणता येईल. आपल्याला हात, पाय, डोळे दिले, त्याचा वापर करण्याचा संदेशही या बालसाहित्यिकांनी दिला.
बंधूप्रेमाची शिकवण या कथेतून श्याम व त्यांच्या मोठ्या भावाने दिलेल्या संदेशाला उजाळा दिला.
श्यामला फुले खूप आवडायची. ते त्यांच्या बालमित्रांसमवेत फुले गोळा करायला जायची. त्यांची आई त्या फुलांचे हार करून देवाला अर्पण करत असे.
यासारख्या विविध कथांच्या माध्यमातून मुलांवर श्रम संस्कार, शिकण्याचा संस्कार, मोठ्याच्या आदर करण्याचा संस्काराचे कसे बिजारोपण झाले याची माहिती या विद्यार्थ्यांनी करून दिली,
तर काव्य वाचनातून आईची माहिती विशद केली गेली. त्यात एक विद्यार्थिनी म्हणते,
मानवाची हाक असते आई,
शब्द जाग असते आई
अंतरीचे गुण असते आई,
ईश्वराचे रूप असते आई,
पंढरीची वारी असते आई
तर दुसरा कवी थेट चंद्रावरच्या शाळेतच घेवून जातो.
तो म्हणतो, जाईन मी एक दिवस
चंद्रावरच्या शाळेत
शिकेल खूप खूप
आणि मित्र बनवेल खूप सारे
यासारख्या विविध कवितांना काव्यवाचल कट्टा चांगलाच रंगला.