चोपडा बसस्थानकात वृद्धाची खिसेकापू टोळीने केली चोरी; चार आरोपी गजाआड, एक पोलीस उपनिरीक्षकही समाविष्ट.

24 प्राईम न्यूज 19 April 2025
चोपडा – दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी चोपडा बस स्थानकात बसमध्ये चढणाऱ्या 76 वर्षीय वृद्धाच्या खिशातून 5,000 रुपयांची रोकड चोरी करण्यात आली. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता.
गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता चोपडा शहर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा जळगावच्या संयुक्त पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने चोपडा नगरपालिकेच्या पाठीमागील स्मशानभूमीजवळ उभी असलेली चारचाकी गाडी संशयावरून तपासली. त्यामध्ये बसलेल्या चार जणांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे –
- प्रल्हाद पिराजी मान्टे (57), पोलीस उपनिरीक्षक, जालना
- अंबादास सुकदेव साळोकर (40), मयुरेश्वर नगर, घाटपुरी, बुलढाणा
- रऊफ अहमद शेख (45), महाळस, बीड
- श्रीकांत भिमराव बघे (27), खामगाव, बुलढाणा
या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून 15,100 रुपये रोकड, चार मोबाईल फोन्स आणि अंदाजे 3.5 लाख किंमतीची टाटा इंडिका गाडी असा एकूण 4.22 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे प्रमुख आरोपी प्रल्हाद मान्टे हे सध्या जालना पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्यांना न्यायालयात हजर केले असता 19 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
संपूर्ण कारवाई पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पोउनि जितेंद्र वल्टे करीत आहेत.