वक्फ कायद्यातील सुधारणा प्रकरणी मुस्लिम समाजाची नाराजी; -दाऊदी बोहरा समाजाच्या सय्यदना यांना वक्फ बचाव समितीचे निवेदन..

24 प्राईम न्यूज 19 April 2025
दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन दाऊदी बोहरा समाजाच्या शिष्टमंडळाने वक्फ कायद्यातील सुधारणांबद्दल आभार मानल्याच्या वृत्तानंतर मुस्लिम समाजात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत वक्फ बचाव समिती, जळगाव तर्फे दाऊदी बोहरा समाजाचे धर्मगुरू सय्यदना मुफ्फादल सैफुद्दीन यांना एक निवेदन पाठवण्यात आले. हे निवेदन जळगाव जिल्हा बोहरा समाजाचे सचिव हातिम इंजिनिअर यांच्या मार्फत देण्यात आले.
सदर निवेदनात मुस्लिम समाजाच्या भावना मांडत वक्फ कायद्याविषयीचा गैरसमज नोंदवण्यात आला आहे. बोहरा समाजाने वक्फ कायद्याचा विपर्यास करून त्याचे समर्थन केल्याने मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे नमूद करण्यात आले आहे.
वक्फ कायदा असंविधानिक असल्याचा आरोप करत त्याविरोधात देशभरातून एक कोटीहून अधिक नागरिकांनी लेखी आक्षेप नोंदवले असून, लोकसभा व राज्यसभेतही अनेक खासदारांनी विरोध व्यक्त केला आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयानेही याची दखल घेत तात्पुरती स्थगिती दिल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
वक्फ बचाव समितीच्या शिष्टमंडळाने हातिम इंजिनिअर यांची भेट घेऊन ही नाराजी सय्यदना यांच्यापर्यंत पोहोचवण्याची विनंती केली असता, त्यांनी भावनांची दखल घेत हे निवेदन त्वरित पोहोचवले जाईल, असे आश्वासन दिले.
शिष्टमंडळात सहभागी सदस्य:
मुफ्ती खालीद, मुफ्ती रमीज, मौलाना कासिम नदवी, हाफिज रहीम पटेल, सय्यद चांद, फारुक शेख, मजहर पठाण, कासिम उमर, अब्दुल रऊफ टेलर, मुजाहिद खान, अखिल शेख आदींचा समावेश होता.