चोरीची पिकअप गाडी अमळनेरात विक्रीसाठी; मध्य प्रदेशातील दोघे चोरटे अटकेत..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे माऊली टी हाऊस, गलवाडे रोड येथे नाकाबंदी लावण्यात आली. रात्री 8 वाजेच्या सुमारास एक पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी संशयास्पदरीत्या दिसून आली. गाडीवर MH 18 G 3221 असा क्रमांक असला तरी, तपासणीअंती खाली MP 43 G 2132 असा मूळ क्रमांक आढळला.
गाडीतून फिरोज खान अमित खान (वय 29, रा. उज्जैन) व दानिश शेख (वय 23, रा. साजापूर) हे दोघे संशयित आढळले. त्यांनी वाहनाचे कागदपत्रे व मालकाबाबत समाधानकारक माहिती दिली नसल्याने गाडी जप्त करून पोलिस स्टेशनला आणण्यात आली. पुढील तपासात गाडी 12 एप्रिल रोजी रतलाम येथून चोरी गेल्याचे निष्पन्न झाले असून, त्या प्रकरणी गुन्हाही दाखल आहे.
हे दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांची ओळख साजापूर कारागृहात झाली होती. 17 एप्रिल रोजी रतलाम पोलिसांच्या पथकाने अमळनेर येथे येऊन संशयित आरोपी व वाहन ताब्यात घेतले. त्यांच्याकडून आणखी गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.