अमळनेर नगरपालिकेत एकाच ठेकेदाराच्या ३ एजन्सींना काम देऊन बोकाळला भ्रष्टाचार; -राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून अमरण उपोषणाचा इशारा..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर नगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागात एकाच ठेकेदाराच्या तीन एजन्सींना वार्षिक कार्यादेश देऊन शासकीय दरापेक्षा तब्बल ४० ते ५० पटीने अधिक दराने कामे देण्यात आल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भुषण संजय भदाणे यांनी केला आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची मंत्रालयीन स्तरावर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली असून चौकशी न झाल्यास येत्या १ मे महाराष्ट्र दिनापासून अमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
भदाणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून हा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला आहे. गेल्या काही वर्षांपासून अमळनेर नगरपालिकेत विशेषतः पाणीपुरवठा विभागात वार्षिक फंडांतर्गत झालेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, आदिनाथ कॉर्पोरेशन, वरद कॉम्प्युटर आणि श्री. जी. सेल्स या एकाच ठेकेदाराच्या मालकीच्या तीन एजन्सींना सलग काही वर्षे वार्षिक कार्यादेश देण्यात आले. या कार्यादेशांमध्ये शासकीय दरापेक्षा अनेक पटीने अधिक दर आकारण्यात आले, असा स्पष्ट आरोप आहे.
याप्रकरणी केवळ नगरपालिकेच्या पातळीवर नव्हे, तर मंत्रालयीन स्तरावर चौकशी व्हावी आणि दोषी ठेकेदारास ब्लॅकलिस्ट करत संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. याआधीही संबंधित ठेकेदाराने पाईपलाइनच्या कामांमध्ये अनियमितता केली होती, असेही भदाणे यांनी स्पष्ट केले.
त्यांनी दिलेल्या निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच अमळनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे.
येत्या १ मे पर्यंत जर चौकशी सुरू झाली नाही, तर नागरिकांना घेऊन नगरपालिकेतच अमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा कडक इशारा भदाणे यांनी दिला आहे.