बाबा सिद्दीकींनी काँग्रेसचा हात सोडला..

24 प्राईम न्यूज 9 फेब्रु 2024. उत्तर मध्य मुंबईतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसचा हात सोडला आहे. आपण काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा देत असल्याचे सिद्दीकी यांनी गुरुवारी एक्सवरून जाहीर केले. ऐन राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर सिद्दीकी यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. बाबा सिद्दीकी हे मुंबईतील अल्पसंख्यांक समाजात प्राबल्य असणारे नेते समजले जातात. सिद्दीकी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
मी लहान वयातच काँग्रेसशी जोडला गेलो. गेल्या ४८ वर्षांपासून मी पक्षात होतो. माझा हा प्रवास मी थांबवतो आहे. कारण आज मीकाँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, असे सिद्दीकी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. सिद्दीकी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. सिद्दीकी यांचे पुत्र झिशान हे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यामुळे तेही वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता आहे.