अशोक चव्हाणांचा काँग्रेसला धक्का !

पक्ष सदस्यत्वासह आमदारकीचाही राजीनामा, भाजपमध्ये गुरुवारी प्रवेश
24 प्राईम न्यूज 13 Feb 2024. अशोक चव्हाण यांच्या एका निकटवर्तीची सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी सुरू आहे. या चौकशीमुळे अशोक चव्हाण गेले काही दिवस अस्वस्थ होते. ईडीच्या चौकशीचा ससेमिरा आपल्यामागे लागणार असल्याची कुणकुण त्यांना होती. याशिवाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर चव्हाण नाराज होते. त्यामुळे चव्हाण काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेत त्यांनी अर्धी चर्चा खरी ठरवली. चव्हाण यांनी सोमवारी सकाळी विधान भवनात येऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. नार्वेकर यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. त्यानंतर चव्हाण यांनी नाना पटोले यांना पत्र लिहून पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. चव्हाण यांच्या पावलावरपाऊल ठेवून काँग्रेसचे अनेक आमदार राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यात नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांचा समावेश आहे.
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीची उत्सुकता वाढली आहे. चव्हाण यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करून घेण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोध असल्याचे समजते. त्यामुळे भाजपकडून चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते. नांदेड जिल्ह्यातील काही आमदार अशोक चव्हाण यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे. त्यात माधवराव पाटील जळगावकर (हदगाव), मोहनराव हंबर्डे (नांदेड दक्षिण), जितेश अंतापूरकर (देगलूर), अमित झनक (रिसोड), माजी राज्यमंत्री दत्तात्रय सावंत, माजी आमदार अमर राजूरकर आदींच्या नावाची चर्चा आहे. याशिवाय मुंबईतून अस्लम शेख, अमीन पटेल यांच्या नावाची चर्चा आहे, मात्र शेख यांनी आपण काँग्रेस पक्षातच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.