अजित पवारच राष्ट्रवादीचे दादा.. – विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निर्णय..

24 प्राईम न्यूज 16 Feb 2024 शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपात्रतेबाबतचा फैसला देखील विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीच असल्यावर राहुल नार्वेकर यांनी शिक्कामोर्तब केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक रचना किंवा पक्ष संघटनेवरून कोणता गट हा पक्ष आहे, हे निश्चित होत नाही. त्यामुळे विधिमंडळ पक्षाच्या संख्याबळानुसार अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निष्कर्ष नोंदवत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. या प्रकरणात राज्यघटनेतील पक्षांतर बंदीचे १० वे परिशिष्ट लागू होत नाही, असे स्पष्ट करत नार्वेकर यांनी दोन्ही गटाच्या आमदार अपात्रतेच्या याचिका फेटाळून लावल्या.
नार्वेकरांच्या निर्णयाचे अजित पवार गटाने स्वागत केले असून शरद पवार गटाने अध्यक्षांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगितले. दरम्यान, संविधानातील तरतुदी, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचना, दहाव्या परिशिष्टातील तरतुदी या सर्वांना समोर ठेवून हा निर्णय दिला आहे. संसदीय लोकशाहीला आणखीन मजबूत करण्याचेच काम हा निर्णय करेल, अशी प्रतिक्रिया राहुल नार्वेकर यांनी निकालानंतर व्यक्त केली.