शरद पवारांची पॉवरफुल्ल राजकीय खेळी. -अजितदादांसह सुनील तटकरेंना दिला मोठा धक्का

24 प्राईम न्यूज 22 Feb 2024. खासदार शरद पवार यांनी बुधवारी पॉवरफुल्ल राजकीय खेळी करत एकाच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे या दोघांनाही मोठे धक्के दिले. अजितदादांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी आपले आजोबा शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला. तर रायगडमधील अनिल तटकरे यांची आपल्या पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करत शरद पवारांनी सुनील तटकरे यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे.
युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. बुधवारी बारामतीतोल शरद पवार गटाच्या कार्यालयात ते उपस्थित होते. मी बारामतीमध्ये शरद पवार सांगतील त्या उमेदवारासाठी प्रचार करेन, असे त्यांनीसांगितले. दुसरीकडे सुनील तटकरे यांचे बंधू अनिल तटकरे बुधवारी शरद पवार गटात दाखल झाले. त्यामुळे आगामी काळात या दोन बंधूमध्येच राजकीय द्वंद्व रंगतानाचे पहायला मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अनिल तटकरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. आगामो लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून खासदार सुनील तटकरे यांची रायगडमधून उमेदवारी निश्चित मानली जात आहे, तर सुनील तटकरे यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून अनिल तटकरे यांना मोठी ताकद देण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात रायगडचे राजकारण तापण्याची शक्यता आहे.