रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकास कामांचे पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाइन भूमिपूजन..

अमळनेर /प्रतिनिधी. ‘अमृत भारत स्टेशन योजना’ अंतर्गत अमळनेर स्थानकाचा समावेश झाल्याने स्टेशनच्या पुनर्विकास कामांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी ऑनलाइन भूमिपूजनकरण्यात आले.

या योजनेंतर्गत सुमारे २९ कोटी निधीतून विकास कामे होऊन स्टेशनचा संपूर्ण कायापालट होणार आहे. ऑनलाइन उद्घाटनाची जय्यत तयारी अमळनेर स्टेशनवर करण्यात आली होती. भारतातील ५५४ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास आणि १५०० रोड ओव्हर ब्रिज/अंडरपास याची पायाभरणी व उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते ठेवण्यात आले होते.
पंतप्रधान ऑनलाइन येण्यापूर्वी मंचावर उपस्थित असलेल्या माजी आमदार स्मिता वाघ, माजी सभापती श्याम अहिरे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष भिकेश पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
दुपारी १ वाजता पंतप्रधान मोदी ऑनलाइन स्क्रीनवर आल्यानंतर त्यानी मनोगत व्यक्त करून पुनर्विकास कामांचे कळ दाबूनभूमिपूजन केले. त्याचवेळी अमळनेर येथे उपस्थित खासदार उन्मेष पाटील, स्मिता वाघ व मान्यवरांनी कोनशीला अनावरण केले. शेवटी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी वलसाड येथील रेल्वेचे सिनियर डी ई जसविंदर पाल, अमळनेरचे सीएमआय रवी पांडे, स्टेशन मास्तर अनिल शिंदे, असिस्टंट इंजिनिअर अनिल अग्निहोत्री तसेच बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, संचालक समाधान धनगर, व्ही. आर. पाटील, नीरज अग्रवाल उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रमोद नायर व निकिता सोनवणे यांनी केले.