महाविकास आघाडीचे सूत्र ठरले शरदचंद्र पवार गट ८ जागा, काँग्रेस २०, शिवसेना ठाकरे गट २०.

24 प्राईम न्यूज 7 Mar 2024. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बुधवारी दुपारी वरळीतील फोर सिझन हॉटेलमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत मविआच्या लोकसभा जागावाटपाचे सूत्र जवळपास निश्चित झाल्याचे समजते. या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेस आणि शिवसेनेच्या वाट्याला प्रत्येकी २० जागा आणि राष्ट्रवादीला ८ जागा मिळणार आहेत, तर काँग्रेस आणि शिवसेना आपल्या कोट्यातील प्रत्येकी ३ जागा (अकोला, सांगली, वर्धा) वंचित बहुजन आघाडीला सोडणार असल्याचे समजते. राष्ट्रवादीच्या कोट्यातील हातकणंगले आणि माढा लोकसभेची जागा ही अनुक्रमे राजू शेट्टी, महादेव जानकर यांना सोडण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. तसेच काँग्रेस आणि शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीनेही आपल्या कोट्यातील जागा सोडाव्यात, अशी चर्चा आघाडीत सुरू आहे. तिन्ही पक्षांनी प्रत्येकी २ जागा वंचितला सोडल्या तर निवडणुकीत वंचितच्या कार्यकत्यांना निवडणूक प्रचारात उतरवणे आणखी सोपे जाईल, या प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. या बैठकीला शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) प्रमुख शरद पवार, आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर आदी नेते उपस्थित होते.