केसाने आमचा गळा कापू नका !रामदास कदम यांचा भाजपला इशारा.

0

24 प्राईम न्यूज 8 Mar 2024.

महायुतीतील लोकसभेच्या जागावाटपावरून शिवसेनेत तीव्र असंतोष असून नेते रामदास कदम यांनी गुरुवारी पक्षातील असंतोषाला मोकळी वाट करून दिली. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा आहे, परंतु तुमच्यावर विश्वास ठेवून जे लोक आले आहेत त्यांचा केसाने गळा कापू नका, असा इशारा कदम यांनी भाजपला दिला.लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवस मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी लोकसभेच्या जागांबाबत चर्चा केली. या चर्चेचा अधिकृत तपशील समोर आला नसला तरी शिंदे गटाला मनासारख्या जागा मिळणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत तेव्हाच्या एकत्रित शिवसेनेने २२ जागा लढवल्या होत्या. इतक्या जागा भाजप सोडायला तयार नाही. सध्या शिंदे यांच्यासोबत विद्यमान १३ खासदार असून या खासदार संख्येइतक्या जागा मिळाव्यात, अशी शिंदे गटाची मागणी आहे. भाजपकडून ही मागणी पूर्ण होणे अवघड बनल्याने शिंदे गटात संताप आहे.

या पार्श्वभूमीवर गुरुवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना रामदास कदम यांनी भाजपवर हल्ला चढवला. ज्या आमच्या जागा आहेत

तिथे काही भाजपची मंडळी आम्ही उमेदवार आहोत असे सांगत आहेत. जिथे जातील तिथे हे सुरू आहे. रत्नागिरी, रायगड, मावळ, संभाजीनगर या ठिकाणी हा प्रकार सुरू आहे. जे चालले आहे ते महाराष्ट्र भाजपच्या माध्यमातून घृणास्पद सुरू आहे. त्यामुळे मोदी-शहा यांनी महाराष्ट्रातील काही नेत्यांचे कान पकडले पाहिजेत, असे कदम म्हणाले. मोदी-शहांकडे बघून आम्ही भाजपसोबत आलो आहोत, मात्र पुन्हा पुन्हा विश्वासघात झाल्यास माझे नाव रामदास कदम आहे हे लक्षात ठेवा, असेही त्यांनी बजावले. २००९च्या विधानसभा निवडणुकीत युती असताना गुहागरमध्ये भाजपनेच मला पाडले हे वास्तव आहे. आता माझ्या मुलाच्या विधानसभा

मतदारसंघात सार्वजानिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपचे कार्यकर्ते स्थानिक आमदाराला बाजूला सारत अर्थसंकल्पातून कामे आणून भूमिपूजन आणि उद्घाटने करीत आहेत. माझ्या मुलाला हेतुपुरस्सर त्रास दिला जात आहे. असे असेल तर भविष्यात भाजपवर कुणी विश्वास ठेवणार नाही. याची दखल वरिष्ठ पातळीवरून भाजपच्या नेत्यांनी घेतली पाहिजे, अशी अपेक्षाही कदम यांनी बोलून दाखवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!