भाजपला ४०० पार करणे ईव्हीएमशिवाय अशक्य! -प्रकाश आंबेडकर

24 प्राईम न्यूज 8 Mar 2024.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी
‘अब की बार, ४०० पार’ असा नारा भाजपने दिला असला तरी ४०० पार लक्ष्य गाठणे भाजपला ईव्हीएमशिवाय शक्य होणार नाही, असे टीकास्त्र वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी सोडले. ईव्हीएममधील हॅकिंग थांबविण्यासाठी मतदानानंतर व्हीव्हीपॅटची पावती पडताळणीसाठी मतदारांना मिळणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महाआघाडीत वंचितच्या समावेशाबद्दल अद्यापही बोलणी सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी दादर येथील डॉ. बाबसाहेब आंबेडकर भवनात पत्रकार परिषद घेऊनईव्हीएम मशिन्स कशी हॅक केली जाते याचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले, मतदानानंतर व्हीव्हीपॅटची पावती मतदारांना मिळायला हवी त्याची पडताळणी केल्यानंतर ती बॅलेट बॉक्समध्ये टाकावी. यासंदर्भात आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटून ही मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ईव्हीएममधील मतांची मोजणी झाल्यानंतर निकाल घोषित करणे अपेक्षित असते. मात्र उमेदवारांनी पुनर्मोजणीसाठी व्हीव्हीपॅटची मागणी केली तर यामध्ये निकाल कोणता मानायचा अशी शंका आंबेडकर यांनी उपस्थित करत व्हीव्हीपॅटचा निकाल अंतिम असेल या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे, यासाठी निवडणूक आयोगाकडे आग्रह धरणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे सर्व पक्षांना घेऊन जाऊ व यामधील वस्तूस्थिती सांगू, अशी चर्चा महाविकास आघाडीच्या बैठकीत केल्याचे त्यांनी सांगितले.