सामाजिक एकात्मतेचा प्रतीक ठरला अमळनेरचा पतंग उत्सव–
सर्व स्तरातील मंडळींनी एकत्रित येऊन घेतला मनमुराद आनंद.

अमळनेर(प्रतिनिधि) अमळनेर एरवी आपापल्या क्षेत्रात कामानिमित्त मग्न असणारे विविध क्षेत्रातील मान्यवर अमळनेर येथे विनोदभैय्या पाटील मित्र परिवार आणि रोटरी क्लब यांनी मकरसंक्रांतला आयोजित केलेल्या पंतग उत्सवानिमित्त एकत्रित आल्याने हा उत्सव एकप्रकारे सामाजिक एकात्मतेचे प्रतिकच ठरला.
विशेष म्हणजे यंदा गलवाडे रस्त्यावरील पू. सानेगुरुजी कर्मभूमी स्मारकाच्या टेकडीवर हा उत्सव झाल्याने स्मारकाचा संपुर्ण परिसर गजबजून गेला. यानिमित्ताने स्मारकावर होत असलेल्या वृक्षारोपण कार्याचे दर्शन देखील अमळनेरकरांना झाले. आ.अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते रोटरीची पतंग हवेत सोडुन या उत्सवाचे उदघाटन झाले. “कुणी लहान नाही” की “कुणी मोठा नाही”, “कुणी गरीब नाही” की “कुणी धनिक नाही”येथे सर्व समसमान, सर्वांची पतंग देखील समान आणि धागा ही समान एवढंच काय तर प्रत्येकासाठी हवेचा जोर देखील समान, मात्र फरक असा की बच्चे कंपनीची पतंग दूर आकाशात तर मोठ्यांची पतंग मात्र जेमतेम दोनशे तीनशे फुटावर असा विचित्र खेळ या उत्सवात दिसून आला. संगीतमय मैफिलीत सर्वांनी सहकुटुंब या उत्सवात सहभागी होऊन आनंद घेतला. विशेष म्हणजे आमदारांना देखील मोह झाल्याने त्यांनीही बच्चे कंपनीच्या हातून पतंग घेत ढील देण्याचा आनंद घेतला. याठिकाणी आयोजकांकडून पतंग पुरविण्यात आल्या होत्या, तर केवळ आकर्षण म्हणून गुजरात येथील विविध आकाराच्या नाविन्यपूर्ण पतंग देखील मागविण्यात आल्या होत्या. नायलॉन मांजाला बंदी असल्याने कुणीही तो वापरणार नाही याची पुरेशी काळजी अयोजकानी घेतली होती. सायंकाळी 7 पर्यंत हा उत्सव सुरू होता. यानंतर सर्वांनी एकमेकांना तिळगुळ देऊन निरोप घेतला.
या उत्सवासाठी सानेगुरुजी स्मारकाच्या दर्शना पवार यांनी अनमोल सहकार्य केले. त्यांनी यानिमित्ताने सर्व मंडळी स्मारकावर पोहोचल्याने आभार व्यक्त केले. उत्सवाच्या यशस्वीतेसाठी माजी नगराध्यक्ष विनोदभैय्या पाटील यांच्यासह रोटरी अध्यक्ष किर्तीकुमार कोठारी, सेक्रेटरी ताहा बुकवाला यासह सर्व रोटरी सदस्यांनी परिश्रम घेतले. या उत्सवात लायन्स सदस्य, खा.शि. मंडळ, अर्बन बँक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, महिला मंडळ, पत्रकार मंडळी, डॉक्टर्स, वकील, इंजिनिअर, अधिकारी व नोकरदार वर्ग तसेच व्यापारी बांधव सहभागी झाले होते.

विनोदभैय्या पाटील यांचे झाले कौतुक
अमळनेरात विविध सण आणि उत्सव आयोजित करून लोकांचा आनंद द्विगुणित करण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून अमळनेर येथील आर.के.पटेल परिवार करीत असून स्वर्गीय आर.के.दादा पाटील यांच्या नंतर विनोदभैय्या पाटील यांनी ही सांस्कृतिक चळवळ अमळनेर भूमीत सुरू ठेवली असल्याने सण आणि उत्सवाच्या निमित्ताने अमळनेर परिसरातील विविध क्षेत्रातील मंडळी एकत्र येत असतात. त्यामुळे अमळनेरकरांना या उत्सवांच्या माध्यमातून नेहमीच एकत्र आणणाऱ्या विनोदभैय्या पाटील यांचे आ.अनिल पाटील यांच्यासह सर्वांनी कौतुक केले.