अजितदादांची नाराजी दूर करण्यात यश राष्ट्रवादीला ७ तर शिवसेनेला ११ जागा?

24 प्राईम न्यूज 14 Mar 2024.
केंद्रीय गृहमंमत्री अमित शाह यांनी महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉग्रेसला मोजक्याच जागा देऊन अधिकाधिक जागा लढण्याची योजना आखली होती. परंतु यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेतही खदखद सुरू होती. त्यातच शिवसेनेला १३ जागा दिल्या जातील, असे सांगितले जात होते. परंतु आता त्यांना ११ जागा देण्याची योजना आखली आहे. परंतु राष्ट्रवादीला आता ७ जागा देण्याचे मान्य केले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या अगोदर राष्ट्रवादीला तीनच जागा देण्याची तयारी दर्शविली होती. परंतु आता नव्या फॉर्म्युल्यात त्यांना ७ जागा मिळू शकतात. त्यामुळे महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटल्याचे बोलले जात आहे.
नव्या सूत्रानुसार भाजप ३० जागांवर निवडणूक लढवू शकते, तर शिंदे गटाला ११ आणि अजित पवार गटाला ७ जागा मिळू शकतात, असे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीला जागा वाढवून देऊन त्यांची नाराजी दूर केल्याचे समजते. त्यामुळे आता महायुतीचे जागावाटप येत्या दोन ते तीन दिवसांत जाहीर होऊ शकते. लोकसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी तयारी केली आहे. त्यात महायुतीतील मोठ्या पक्षांच्याच जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याने छोट्या-छोट्या मित्रपक्षांकडे भाजपचे दुर्लक्ष होत होते. त्यामुळे छोट्या मित्रपक्षांची नाराजी ओढवून घेण्याचे काम भाजपने केले आहे.