अॅट्रॉसिटी प्रकरणांच्या सुनावणीवेळी रेकॉर्डिंग अनिवार्य-मुंबई उच्च न्यायालय.

24 प्राईम न्यूज 14 Mar 2024.
अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली (अॅट्रॉसिटी) दाखल गुन्ह्यांशी संबंधित सर्वच प्रकारची सुनावणी ऑडिओ व्हिडीओ रेकॉर्डिंगसह घ्यावी, असा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला. ज्या न्यायालयात अशा प्रकारच्या रेकॉर्डिंगची सुविधा नाही, त्या न्यायालयात राज्य सरकारने लवकरात लवकर रेकॉर्डिंगची सुविधा उपलब्ध करावी, असे आदेशही खंडपीठाने दिले. हा आदेश पूर्वलक्षी प्रभावाने लागू नसेल. पुढच्या सुनावणींबाबत या आदेशाचे पालन करावे लागेल, असेही खंडपीठाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले.
मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी हिच्या आत्महत्येच्या प्रकरणातील आरोपी डॉक्टरांच्या जामीन अर्जावरील निर्णयावर सुनावणी करताना ऑडिओ व्हिडीओ रेकॉर्डिंगचा मुद्दा उपस्थित झाला होता. या महत्त्वाच्या मुद्यावर सुनावणी घेऊन मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय व न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यावर बुधवारी खंडपीठाने आपला निर्णय दिला.