आचारसंहिता म्हणजे काय…

24 प्राईम न्यूज 17 Mar 2024. लोकसभा निवडणुकीच्या तारखा केंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केल्या असून आजपासून संपूर्ण देशात आचारसंहिता लागू झाली. पण ही आचारसंहिता म्हणजे नेमकी आहे तरी काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना नक्कीच पडला असेल. आचारसंहितेचा भंग केल्यानंतर नेमकं होत तरी काय आणि आचारसंहितेचा नेमका भंग तरी कसा होतो, असे एक ना अनेक प्रश्न सर्वसामन्यांच्या मनात येत असतात. या पार्श्वभूमीवर आचारसंहिता म्हणजे नेमकी काय असते, हे जाणून घेऊया…
■ निवडणुकीची तारीख ठरवण्याचे अधिकार हे निवडणूक आयोगाला असतात. निवडणूक आयोग निवडणुकीची घोषणा करतं, तेव्हापासून आचारसंहिता लागू होते.
■ निवडणूक प्रकिया पूर्ण होईपर्यंत आयोगाचे लक्ष आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय पक्ष, तसेच उमेदवारांवर असते. एखादा उमेदवार आचारसंहितेचा भंग करताना आढळला, तर त्या उमेदवाराला बाद करण्याचा अधिकारदेखील आयोगाला असतात.
■ या काळात उमेदवार किंवा पक्षाला कसलीच आश्वासने देता येत नाहीत. तसेच जातीवाचक भाषण तसेच एखाद्याची व्यक्तिगत बदनामी करता येत नाही. तसेच, या काळात लोकांना पैसे वाटले किंवा कसलेही आमिष दाखवले तर तो आचारसंहितेचा भंग होतो आणि त्याच्यावर कारवाई होते.■ प्रचार रात्री १० पर्यंत करावा असे बंधनकारक असून, परवानगीशिवाय कोणतीही सभा घेण्याचा अधिकार पक्षाला किंवा उमेदवाराला नसतो. रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत लाऊड स्पीकर लावता येणार नाही. तसेच, सभेच्या काही दिवस आधी प्रचाराच्या कार्यक्रमाची वेळ, जागा याची माहिती संबंधित पोलिसांना देणे बंधनकारक असते.
■ मतदानाच्या आधी ४८ तास प्रचार करता येणार नाही.
■ मंत्र्यांनाही आचारसंहिता लागू असते. आचारसंहिता लागू झाल्यानंतर मंत्र्यांना कोणतीही विकासात्मक कामांची घोषणा करता येत नाही. तसेच, अधिकाऱ्यांच्या बदल्याही करता येत नाहीत.