रावेरमध्येही बारामतीचा नणंद-भावजय पॅटर्न ? -रक्षा खडसेंविरोधात रोहिणी खडसेंना उमेदवारी देण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न.


24 प्राईम न्यूज 18 Mar 2024. बारामतीप्रमाणेच रावेर लोकसभा मतदारसंघातही नणंद विरुद्ध भावजय लढत व्हावी, असा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून केला जात आहे. भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर शरद पवार गटाकडून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांना राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात उतरविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

शरद पवार गटाने रावेर लोकसभा मतदारसंघातून यापूर्वी एकनाथ खडसे यांची उमेदवारी जाहीर केली होती. खडसे यांनी देखील निवडणूक लढविण्याचे मान्य केले होते. त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात एकनाथ खडसे विरुद्ध रक्षा खडसे सासरे – विरुद्ध सून असा सामना रंगणार काय, याची चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, एकनाथ खडसेंनी प्रकृतीचे कारण देत निवडणूक लढवण्यास असमर्थता दाखवली.भाजपने अधिकृतरीत्या रक्षा खडसे यांची उमेदवारीजाहीर करताच त्यांच्या विरोधात तगड
उमेदवार दिला जावा याबाबत पवार गटाच्या
ज्येष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली. जिल्ह्यातून रोहिणी खडसे यांच्या नावाचा ठराव करून तो
शरद पवार यांच्याकडे पाठवला गेला. यावर गंभीर विचार सुरू असल्याचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे रावेरमध्ये बारामतीप्रमाणे नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार काय, अशी चर्चासुरू झाली.