लोकसभेसाठी जरांगे – पाटलांची चाचपणी. गावागावांतील मत जाणून निवडणुकीचा निर्णय. -३० तारखेला अंतिम निर्णय घेणार – जरांगे पाटील.

0

24 प्राईम न्यूज 25 Mar 2024. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी अंतरवाली सराटीत महाबैठक घेतली. या बैठकीत लोकसभेच्या पर्यायापेक्षा विधानसभेत मराठा समाजाची ताकद दाखवून देऊ, असे सांगतानाच मी निवडणूक लढविणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. दरम्यान, जर लोकसभा निवडणूक लढवायची असेल, तर मराठा समाजाने आपल्या गावात जाऊन मराठा समाजाची बैठक घेऊन चर्चा करावी. तसेच इतर समाजांनाही विश्वासात घ्यावे आणि त्यांचे जे काही मत आहे, ते जसेच्या तसे ३० तारखेपर्यंत कळवावे. तसेच निवडणूक

लढवायची कीनाही, याबद्दलचे मत टक्केवारी रुपात लिहून पाठवावे. मग यावर ३० मार्च रोजी निर्णय घेऊ, अशी घोषणा जरांगे पाटील यांनी केली. त्यामुळे ३० तारखेला जरांगे पाटील काय डाव टाकणार हे स्पष्ट होणार आहे.

लोकसभा निवडणुकीबाबत समाजाची भूमिका निश्चित करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे रामगव्हाण रोडवरील मैदानावर मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीला राज्यभरातून मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांनी लोकसभेबाबत प्रथम आपले मत मांडले.

ते म्हणाले की, माझे वैयक्तिक मत विचारात घेत असाल, तर आपण लोकसभा निवडणुकीच्या नादी न लागता विधानसभा निवडणुकीत त्यांना हिसका दाखवून देऊ. मी स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरणार नाही, असेही त्यांनी जाहीर करून टाकले. मात्र, जर समाजाला लोकसभा निवडणूकही लढवावी वाटत असेल, तर ते आपल्याला आताच घोषित करता येणार नाही किंवा जिल्हा कार्यकारिणीने ठरवूनही चालणार नाही, तर त्यासाठी मराठा बांधवांनी प्रथम आपापल्या गावांत जावे आणि तेथे मराठा समाजाची बैठक बोलावून ग्रामस्थांशी चर्चा करावी. एवढेच नव्हे, तर वेगवेगळ्या पक्षांत काम करणाऱ्या बांधवांनाही बोलावून घेऊन त्यांचे मत जाणून घ्यावे आणि ते जे काही बोलतील किंवा सांगतील, ते जसेच्या तसे माझ्याकडे लेखी स्वरुपात पाठवावे. तसेच हे करताना इतर समाजालाही विश्वासात घेणे फार गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांची मते कळवितानाच निवडणूक लढविण्याबाबतच्या दोन्ही बाजू ३० मार्चपर्यंत टक्केवारीत लेखी कळवाव्यात, म्हणजे आपल्याला पुढील निर्णय घेता येईल, असे जरांगे पाटील म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!