मंत्री गिरीश महाजन यांच्या समोरच भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये वादावादी.


24 प्राईम न्यूज 27 Mar 2024. जळगाव। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाल्याचे समोर आले आहे. याबाबतची एक चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल झाली असून भाजपमध्ये नेमके चालले तरी काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदारसंघांतील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची जळगाव येथील ब्राह्मण सभागृहात बैठक झाली. बैठकीला भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील काही पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी गिरीश महाजन यांच्याकडे खासदार रक्षा खडसे यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर महाजन यांनी नाराज पदाधिकाऱ्यांना कार्यालयात येण्यास सांगितले. कार्यालयात बंद दाराआड झालेल्या बैठकीत वाद झाल्याचे सांगितले जाते. वरणगाव येथील माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी रक्षा खडसे आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. रक्षा खडसे त्यांचे सासरे एकनाथ खडसे यांचे नाव वारंवार घेतात. मात्र, मंत्री महाजन यांचे नाव का घेत नाहीत, असा प्रश्न पदाधिकाऱ्यांनी विचारला. यावर खासदार खडसे यांनी, मी नाथाभाऊंचे नाव घेतेच. मात्र, गिरीश महाजनांचे नावही प्रत्येक भाषणात घेत असते. तुम्ही काही आरोप लावू नका, असे प्रत्युत्तर दिले. रक्षा खडसे या नेहमी भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडून शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन फिरत असतात, असा आरोपही भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला.
