पक्ष फोडणाऱ्यांना लोक योग्य जागा दाखवतील. -शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा.

24 प्राईम न्यूज 8 Apr 2024. पक्ष फोडणाऱ्यांना लोक योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

बारामतीतील जाहीर सभेत पवार म्हणाले की, मी दोन पक्ष फोडून आलो, असे फडणवीसांनी सांगितले. त्यांचे काय कर्तृत्व आहे, ते सांगत आहेत, पण फोडलेल्या पक्षांमध्ये हजारो, लाखो कार्यकर्ते आहेत. जनताही आमच्यासोबत आहे. त्यामुळे असे बोलणाऱ्यांना लोक योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. खऱ्या अर्थाने आपण माणसे एकत्र जोडण्याचे काम करतो, त्यांच्याबद्दल आदर दाखवतो, पण यांनी पक्ष फोडले. तरी कार्यकर्ते मजबुतीने उभे आहेत. काही जण दमदाटी करीत आहेत, पण त्यांना माहीत नसेल की, दमदाटीला बळी पडणारी ही औलाद नाही. आज बारामतीकडे सुदैवाने देशाचे लक्ष आहे. आपण नक्की जास्त जागा जिंकू, असा विश्वास शरद पवारांनी यावेळी व्यक्त केला.
