गुजरातचे आत्मे महाराष्ट्रात भटकत आहेत-संजय राऊत

24 प्राईम न्यूज 1 May 2024. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या नावाचा थेट उल्लेख न करता त्यांचा भटकती आत्मा म्हणून उल्लेख करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मंगळवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. नरेंद्र मोदीच खरा भटकता आत्मा आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली, तर गुजरातचे आत्मे महाराष्ट्रात भटक्त आहेत, असा हल्लाबोल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी चढवला.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात धर्माचा उल्लेख कुठेही केलेला नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने काँग्रेसबद्दल अपप्रचार करीत आहेत. काँग्रेस मंगळसूत्र आणि स्त्रीधन हिसकावून घेऊन मुस्लिमांना देणार, अशी विधाने पंतप्रधानांना शोभत नाहीत. सातत्याने खोटे बोलत महाराष्ट्रभर फिरणारे नरेंद्र मोदीच खरी भटकती आत्मा आहेत. मोदींनी कोणती पदवी घेतली हे माहीत नाही, पण त्यांना जाहीरनामा वाचता येत नसेल तर काँग्रेस त्यांना समजावून सांगेल. काँग्रेसबद्दल सातत्याने खोटे बोलून नरेंद्र मोदींनी जनतेची दिशाभूल करून संभ्रम निर्माण करू नये, असे पटोले यांनी भाजपला सुनावले आहे.