अमळनेरातील इस्लामपूरा येथील दोन विद्यार्थ्यांचा रशिया येथे नदीत बुडून मृत्यू..

अमळनेर/प्रतिनिधी. अमळनेर शहरातील इस्लामपुरा भागातील दोन एम बी बी एस चे विद्यार्थी रशिया येथील नोवगोरोड च्या नदीत वाहून बेपत्ता झाले. ४ रोजी रात्री भारतीय वेळेनुसार सव्वा अकरा वाजेच्या सुमारास व रशिया येथील नऊ वाजेच्या सुमारास घटना घडली. जिशान अशपाक पिंजारी वय २० व त्याच्या आत्याची मुलगी जिया फिरोज पिंजारी वय २० दोन्ही रा इस्लामपुरा अमळनेर अशी वाहून गेलेल्या मुलांची नावे आहेत.
४ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास जिशान , जिया आणि इतर विदयार्थी रशियात वोल्कोव्ह नदीच्या काठावरील पेडिस्टन पुलाजवळ चौपाटीवर फिरायला गेले होते. नेहमीप्रमाणे जिशान याने आपल्या आई शमीम ला व्हिडीओ कॉल केला. तेव्हा रात्रीचे सव्वा अकरा वाजले होते. जिया कशी नदीत गुडघाभर पाण्यात उतरली आहे हे आनंदाने तो आपल्या आईला दाखवत होता. अन जणू काही त्याच्या आईला दुर्दैवाचे संकेत प्राप्त झाले होते की काय ? लगेच शमीम यांनी जिशान याला सांगितले की बेटा तू पाणी मे मत जा और जिया को भी बाहर निकाल ,और जलदी घरपे पहुचो …आपल्या आईला त्याने सकारात्मक प्रतिसाद देत त्याने लगेच व्हाट्सअप वर संदेश टाकला की आम्ही घरी जातो. अवघ्या १५ मिनिटात नदीला पूर आला अन क्षणात बघता बघता जिशान ,जिया सह चार विदयार्थी पुराच्या पाण्यात वाहून गेले. गेल्या वर्षभरापूर्वी दोघे रशियाला रवाना झाले होते. पुढील महिण्यात २३ जुलै रोजी त्यांनी विमानाची बुकिंग करून ठेवली होती. मात्र नियतीला हे मान्य नव्हते… गेल्या वर्षाची त्यांची शेवटची भेट ठरली.