धनदाई महाविद्यालयात विद्यार्थी व पालकांसाठी कार्यशाळा संपन्न..

0

अमळनेर/प्रतिनिधी. येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयातर्फे तर्फे बारावी उत्तीर्ण विद्यार्थी व पालकांसाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार होणारी “प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया व एकूण पदवीचे स्वरूप” या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत उपप्राचार्य प्रा.डॉ.लीलाधर पाटील यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील हे अध्यक्षस्थानी होते तर विचारपीठावर डॉ किशोर पाटील, डॉ जयवंतराव पाटील, प्रा पी. डी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने 2024 25 या शैक्षणिक वर्षापासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केले असून यानुसार पदवीसाठी तीन व चार वर्षाचे अभ्यासक्रम उपलब्ध असतील. विद्यार्थ्यांसाठी लवचिकता व निवडीचे स्वातंत्र्य हे या अभ्यासक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य असून कला शाखेतील विद्यार्थ्यांना एक विषय विज्ञान शाखेचा तर विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना एक विषय कला शाखेचा निवडता येणार आहे. त्याचप्रमाणे एन एस.एस., एनसीसी, क्रीडा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभाग यासाठी देखील विद्यार्थ्यांना क्रेडिट मिळणार असून विद्यार्थ्यांनी उघडलेल्या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट मध्ये हे क्रेडिट जमा होतील. बदलत्या काळानुसार व प्रत्यक्ष जीवनात उपयोगी पडणारे विविध विषय या अभ्यासक्रमात उपलब्ध करून दिले आहेत. प्रकल्प, रिसर्च प्रोजेक्ट, ऑन जॉब ट्रेनिंग, इंटर्नशिप याद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहाराचा अनुभव घेता येईल. या संदर्भात असलेल्या अभ्यासक्रमांचे पावर पॉइंट प्रेझेंटेशन यावेळी प्रा डॉ लिलाधर पाटील यांनी सादर केले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी प्रवेश प्रक्रिया सुलभ करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील असून महाविद्यालयीन पातळीवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्राध्यापक उपलब्ध असतील तसेच यासाठी विद्यार्थ्यांचे आवश्यक ते समुपदेशन देखील केले जाईल असे सांगून पालकांना देखील याविषयी माहिती घेण्याचे आव्हान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ. किशोर पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. पी. डी. पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!