विधानसभेत सत्ताधाऱ्यांना चितपट करण्यासाठी शरद पवार उतरले आखाड्यात.

24 प्राईम न्यूज 18 Jun 2024. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला चांगलं यश प्राप्त झाल्यानंतर महायुतीचे धाबे दणाणले आहेत. झालेल्या चुका महायुतीने टाळण्याचा निर्णय घेतला असून त्यादृष्टीनं महायुतीच्या बैठका होत आहेत. भारतीय जनता पक्षाने यात आघाडी घेतली आहे. मतदारसंघ निहाय आढावा घेत कशा पद्धतीनं पुन्हा राज्यात सत्ता प्रस्थापित करण्यासाठी जागा जिंकता येतील याचा विचार सुरू केलाय. दुसरीकडं महाविकास आघाडीमधील नेत्यांनी सुद्धा आता हुरळून जाऊ नये, तर अधिक जोमानं लक्ष देऊन वेळप्रसंगी रणनीती बदलून निवडणुकीच्या तयारीला लागलं पाहिजे असा इशारा, शरद पवार यांनी दिलाय. शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना निवडणुकीच्या कामाच्या तयारीचे संकेत दिले आहेत. मात्र, स्वतः शरद पवार हे सुद्धा तयारीला लागले आहेत. शरद पवार यांनी आपल्या पक्षातील नेत्यांकडून स्थानिक परिस्थितीचा आढावा तातडीनं मागवून घेतला आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे आणि कोणत्या मतदारसंघांमध्येआपल्याला अधिक संधी मिळू शकते याबाबत त्यांनी अहवाल मागवला आहे. त्यानुसार राज्यात कोणत्या ठिकाणी किती जागा लढवायच्या याबाबतचा विचार सुरू केल्याची माहिती, पक्षातील नेत्यांनी दिलीय.