तीन नवीन फौजदारी कायदे आजपासून लागू . -ब्रिटिशकालीन कायदे होणार इतिहासजमा.

24 प्राईम न्यूज 1 Jul 2024. देशातील फौजदारी कायद्यात आमूलाग्र बदल करणारे तीन नवीन फौजदारी कायदे १ जुलैपासून लागू होणार आहेत. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या कायद्यांची
सोमवारपासून अंमलबजावणी होणार आहे. या नवीन कायद्यांमुळे देशाच्या न्यायिक व्यवस्थेत व्यापक बदल होणार असून ब्रिटिशकालीन कायदे इतिहासजमा होणार आहेत.
ब्रिटिशकालीन भारतीय दंड संहिता,फौजदारी प्रक्रिया कायदा, भारतीय पुरावा कायद्याची जागा आता तीन नवे कायदे घेतील.
या तिन्ही विधेयकांना २१ डिसेंबर २०२३ रोजी केंद्र सरकारने लोकसभेत मंजुरी दिली होती, तर राज्यसभेत २५ डिसेंबर२०२३ रोजी मंजुरी मिळाली. त्यानंतर राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर या कायद्यांची अंमलबजावणी १ जुलै २०२४ पासून करण्याचे ठरवण्यात आले. या कायद्यात शिक्षा देण्याऐवजी न्याय देण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते.
नवीन कायद्यांची वैशिष्ट्ये
■ फौजदारी खटल्याचा निकाल सुनावणीनंतर ४५ दिवसांत जाहीर करणे बंधनकारक.
| पहिल्या सुनावणीच्या ६० दिवसांच्या आत आरोपपत्र निश्चित करणे अत्यावश्यक.
■ महिला, लहान मुलांच्या गुन्ह्यांचा तपास दोन महिन्यांत पूर्ण करावा लागणार. ९० दिवसांच्या आत पीडितांना खटल्याच्या प्रगतीचे अपडेट द्यावे लागणार.
■ बलात्कार पीडितेचा जबाब महिला पोलीस अधिकाऱ्याकडून तिच्या पालक किंवा नातेवाईकाच्या उपस्थितीत नोंदवला जाईल. वैद्यकीय अहवाल सात दिवसांत येणे आवश्यक आहे.
■ संघटित गुन्हे आणि दहशतवादी कृत्यांची स्वतंत्र व्याख्या करण्यात आली आहे.
| मुलांची खरेदी व विक्री गंभीर गुन्हा
■ बालकावर बलात्कार केल्यास आजन्म जन्मठेप व मृत्युदंडाची तरतूद
■ नवीन कायद्यात महिला आणि मुलांवरील गुन्हे, खून आणि राज्याविरुद्धच्या गुन्ह्यांना प्राधान्य देण्यात आले आहे.
■ नवीन कायद्यात भारतीय दंड संहितेतील ५११ कलमांऐवजी ३५८ कायदे असतील.
■ एखादी व्यक्ती आता पोलीस ठाण्याला प्रत्यक्ष भेट न देता इलेक्ट्रॉनिक मार्गाने तक्रार करू शकते. यामुळे पोलिसांकडून तत्पर कारवाई करणे सुलभ आणि वेगाने होऊ शकते.
■ ‘झिरो एफआयआर’ लागू केल्याने, एखादी व्यक्ती अधिकार क्षेत्राचा विचार न करता कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार करू शकते.
■ पोलीस कारवाईची व्हिडीओग्राफी सक्तीची