कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रूपये द्यावे कृषीभूषण साहेबराव पाटील यांची मंत्री अनिल पाटलांकडे मागणी.

अमळनेर/प्रतिनिधी. धान-भरडधान्य उत्पादकांप्रमाणे तालुक्यातील कापूस उत्पादकांना देखील ५ हजार ऐवजी २० हजार प्रोत्साहनपर अनुदान जाहीर करण्याची मागणी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त अमळनेर तालुक्यातील महसूल मंडलासह राज्यातील १०२१ महसूली मंडळांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करूनसवलती लागू केल्या होत्या. शासनाने २६ मार्च २०२४ अन्वये खरीप पणन हंगाम २०२३-२४ साठी दुष्काळग्रस्त ४० तालुक्यातील धान-भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी २० हजार या प्रमाणे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली आहे. त्याच शेतकऱ्यांप्रमाणेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देखील प्रति हेक्टरी ५ हजार ऐवजी प्रति हेक्टरी २० हजार रुपये प्रोत्साहनपर अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुंबई येथे सुरू असलेल्या २०२४-२५ च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात करावी, अशी मागणी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे केली आहे.