जयंत पाटील पराभूत, काँग्रेसची मते फुटली.

24 प्राईम न्यूज 13 Jul 2024. काँग्रेसच्च्या मतांमध्ये झालेली फाटाफूट, अपक्ष आणि छोट्या पक्षांनी महायुतीला साथ दिल्याने विधान परिषदेतील महायुतीचे सर्व ९ उमेदवार हे विजयी झाले तर महाविकास आघाडीचे तिसरे उमेदवार शेकापचे जयंत पाटील यांना धक्कादायक पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीत पहिला विजय भाजपच्या योगेश टिळेकर यांनी नोंदवला. पहिल्या फेरीत पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण केल्याने भाजपच्या पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे निवडून आले. दुसऱ्या फेरीत सदाभाऊ खोतही जिंकले. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे आणि शिवसेना शिंदे गटाचे कृपाल तुमाने आणि भावना गवळी निवडून आल्या. दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला होता. त्यामुळे यावेळी डॉ. प्रज्ञा सातव यांच्यासाठी काँग्रेस पक्ष कमालीचा दक्ष होता. पक्षाची काही मते फुटतील हे गृहीत धरून काँग्रेसने सातव यांच्यासाठी मतांचा कोटा निश्चित केल्याने डॉ. सातव यासुद्धा पहिल्या फेरीत निवडून आल्या. पहिल्या फेरीत मिलिंद नार्वेकर यांना २४, तर जयंत पाटील यांना १२ मते मिळाल्याने त्यांना पहिल्या पसंतीचा कोटा निश्चित करता आला नाही. त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांची मतमोजणी झाली. या मतमोजणीत मिलिंद नार्वेकर यांनी बाजी मारली.