शॉर्ट सर्किटने रंगांच्या व प्लायवूड च्या दुकानाला आग. सुमारे साडे बारा लाखाचे नुकसान.

अमळनेर /प्रतिनिधी. शॉर्ट सर्किटने रंगांच्या व प्लायवूड च्या दुकानाला आग लागून सुमारे साडे बारा लाखाचे नुकसान झाल्याची घटना १३ रोजी सकाळी धुळे रोडवर बाजार समितीजवळ घडली. अग्निशमन दलाने वेळीच आग विझवल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. अन्यथा शेजारील दुकानांना देखील आग लागली असती.
शुभम पवार यांच्या श्रीदत्त हार्डवेअर ला आग लागल्याची माहिती सकाळी एक अज्ञात व्यक्तीने फोन वरून कळवले. पवार यांनी दुकान उघडून ताबडतोब अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्याठिकाणी विद्युत प्रवाह सुरू असल्यामुळे वायरमन आकाश वाडीले याने वीजपुरवठा बंद केला. आगीचे प्रमाण इतके भयानक होते की दुकानात देखील प्रवेश करता येत नव्हता. अग्निशमन दल प्रमुख दिनेश बिऱ्हाडे , फारुख शेख , जफर पठाण , भिकन पठाण , आनंदा झिम्बल , मच्छिन्द्र चौधरी यांनी तातडीने आग विझवल्याने आजूबाजूच्या दुकानांना आग लागू शकली नाही. मात्र पवार यांच्या दुकानातील सर्व ऑईलपेंट , रंग तयार करण्याचे मशीन , सर्व प्लायवूड जळून खाक झाले होते. शुभम पवार यांचे सुमारे साडेबारा लाखाचे नुकसान झाले आहे. पवार यांचा विमा नसल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शॉर्ट सर्किटमुळे पहाटे दोन वाजेच्या सुमारास आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पोलिसांना माहिती कळवण्यात आली आहे.