प्रताप महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय निबंधलेखन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद..

आबिद शेख/प्रतिनिधी. दिनांक १४ ऑगस्ट २०२४ रोजी प्रताप महाविद्यालयात(स्वायत्त) विद्यापीठस्तरीय निबंधलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. खानदेश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) अमळनेर आणि राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विभाग आयोजित विद्यापीठस्तरीय निबंध स्पर्धेला प्रताप महाविद्यालय व विद्यापीठ परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयाचे एकूण १२० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. ५ जून म्हणजे ‘जागतिक पर्यावरण दिन’ व २८ जुलै ‘जागतिक निसर्ग संवर्धन दिनाचे’ औचित्य साधून आयोजित केलेल्या या स्पर्धेत “पर्यावरण” या मुख्य संकल्पनेवर आधारित वेगवेगळ्या विषयांवर विद्यार्थ्यांनी निबंधलेखन केले. विशेषत: या निबंध स्पर्धेसाठी निःशुल्क प्रवेश देण्यात आले.प्रस्तुत स्पर्धेसाठी अनुक्रमे प्रथम ७ हजार,द्वितीय ५ हजार, तृतीय २ हजार व उत्तेजनार्थ पाच बक्षीसांसाठी प्रत्येकी १ हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे.स्पर्धेच्या सुरुवातीस प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण बी.जैन व संस्थेचे सह सचिव तथा क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ.धिरज वैष्णव यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना पर्यावरण विषयक मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
प्रस्तुत स्पर्धेचा निकाल १९ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार असून स्पर्धेतील बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना दिनांक ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता पूज्य साने गुरुजी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजूषा स्पर्धेच्या विशेष कार्यक्रमात बक्षीस (रोख रक्कम), प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.या स्पर्धेचे समन्वयक प्रा.योगेश पाटील यांसह सह-समन्वयक डॉ.विलास गावीत मराठी विभाग प्रमुख प्रा.ज्ञानेश्वर कांबळे तसेच डॉ. रमेश माने,प्रा.प्रतिभा पाटील, प्रा.किरण पाटील यांनी स्पर्धेचे उत्तम नियोजन केले आणि यशस्वितेसाठी सहकार्य केले.