नाशिकमध्ये दोन गटांत दगडफेक, -परिस्तिथी नियंत्रणात भद्रकालीत अतिरिक्त बंदोबस्त तैनात.

24 प्राईम न्यूज 17 Aug 2024. बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या हिंसक घटनेविरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने शुक्रवारी (दि.१६) नाशिक बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, या बंदला गालबोट लागले. भद्रकालीत हिंदू व मुस्लिम जमाव समोरासमोर आल्यानंतर दोन्ही जमावाकडून दगडफेक करण्यात आली. जमावाच्या हल्ल्यात सहा पोलीस जखमी झाले. यामध्ये दोन पोलीस उपायुक्तांसह दोन महिला व दोन पुरुष पोलिसांचा समावेश आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात भद्रकालीत अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.
बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या हिंसक घटनेविरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने शुक्रवारी (दि.१६) शहरातील विविध भागातून दुचाकी रॅली काढत व्यावसायिकांना दुकाने बंद करत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. दुचाकी रॅली दुपारी दीड वाजेच्या सुमारास पंचवटी भागातून मालेगाव स्टँड, रविवार कारंजा, मेनरोड माग दूधबाजार परिसरात गेली. या रॅलीच्या मागे पंचवटी परिसरातूनच पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे वाहन होते. रॅली दोन वाजेच्या सुमारास दूधबाजार परिसरातआली असता, या ठिकाणी काही मुस्लिम समाजाचे युवक मस्जिदमध्ये नमाज पठणासाठी जात होते. त्यावेळी काही युवकांनी घोषणाबाजी केली. त्यातून मुस्लिम समाजबांधवांच्या भावना दुखावल्या. त्यानंतर हिंदू व मुस्लिम समाजबांधवांमध्ये वाद झाला वादाचे रुपांतर तुफान दगड फेकीत झाले.