राष्ट्रवादी काँग्रेस नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या…

24 प्राईम न्यूज 13 Oct 2024. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर अज्ञात तरुणांनी वांद्रे पूर्व भागातील खेरनगर येथील राम मंदिर परिसरात गोळीबार केला. जखमी अवस्थेत बाबा सिद्दीकी यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ‘एसआरए’ प्रकल्पातील वादातून त्यांची हत्या करण्यात आल्याचे बोलले जाते. दरम्यान, पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
या हल्ल्यात सिद्दिकी यांच्या एका समर्थकाच्याही पायावर गोळी लागली आहे. सिद्दिकी यांना १५ दिवसांपूर्वीच धमकीचे फोन आले होते. त्यानंतर त्यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. असे असतानाही त्यांच्यावर हा हल्ला झाल्याने राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती ढासळली असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लीलावती रुग्णालयात संपर्क साधून डॉक्टरांशी बाबा सिद्दीकी यांच्याविषयी चौकशी केली. सिद्दिकी यांची हत्या झाल्याचेवृत्त समजताच लीलावती रुग्णालय परिसरात त्यांचे कार्यकर्ते व समर्थकांनी गर्दी केली. झिशान सिद्दिकी तसेच अभिनेता संजय दत्त हेही तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल झाले. –अशी घडली घटना
बाबा सिद्दिकी हे रात्री ९.१५ वाजता कार्यालयातून बाहेर पडले. ते कार्यालयाजवळ फटाके वाजत असताना गोळीबार झाल्याचे समजते फटाके फोडत असताना अचानक तोंडाला रूमाल बांधलेले तीन तरुण गाडीतून उतरले. त्यांनी सिद्दिकी यांच्यावर तीन राऊंड फायर केले. सिद्दिकी यांच्या कार्यालयाजवळील राम मंदिराजवळ हा गोळीबार झाला. सिद्दिकी यांना छातीत एक गोळी लागल्यानंतर ते खाली कोसळले. त्यानंतर लोकांनी त्यांना लीलावती रुग्णालयात तातडीने दाखल केले.