‘लाडकी बहीण’चा अन्य बँक ग्राहकांना त्रास.लाडकी बहीण’ योजनेसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्याची मागणी..

आबिद शेख/अमळनेर. राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे जिल्ह्यातील सर्वच बँकांमध्ये महिलांची गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे. यामुळे बँकांमध्ये अन्य कामांसाठी येणाऱ्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्याची मागणी होत आहे.
‘लाडकी बहीण’ योजनेंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. या योजनेचे पैसे आपल्या खात्यात आले की नाही,तसेच हे पैसे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींची गर्दी बँकांमध्ये होत आहे. मोठ्या प्रमाणात महिला येत असल्याने बँकेच्या व्यवस्थापनावर देखील ताण आला आहे. तसेच इतर ग्राहकांनाही लाडक्या बहिणीच्या रांगेत उभे राहावे लागत आहे.
सामान्यांची मागणी.
लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून महिलांची खाते उघडणे, जुन्या खात्याची केवायसी करणे, आधार लिंक करणे: या कामासाठी गर्दी होत आहे. त्यामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांनासुद्धा श्वास घेण्यासही वेळ मिळत नाही. इतर ग्राहकांनाही याचा फटका बसला आहे. लाडकी बहीण योजनेच्या कामासाठी बँकेने स्वतंत्र कक्ष स्थापन करावा. तसेच इतर कामासाठी आलेल्या ग्राहकांना वेगळी रांग करावी अशी मागणी ग्राहक करत आहेत.